मला न समजलेली अमेरिका

मला न समजलेली अमेरिका 

भिडे सरांनी मला हा विषय सुचवला, म्हणून लिहायचं धाडस करतोय. 

एक जुनी गोष्ट आहे, गाणं शिकणाऱ्या बायकोला नवरा सांगतो की तू गाण्याऐवजी पेटी का नाही शिकत. कारण पेटी बेसुरी होत नाही! त्याचप्रमाणे सरांना असंही वाटलं असेल की हा फारच ठाण्याबद्दल लिहितोय तर त्यापेक्षा अमेरिकेबद्दल लिहिलं तर जरा बरं लिहील! 

पण जेव्हा मी विचार करायला बसलो, की काय लिहू, तेव्हा मला फक्त मथळा सुचला. "मला न समजलेली अमेरिका". आजकाल एखाद्या महिन्याच्या टूरिस्टी अनुभवावर लेख लिहायची प्रथा आहे. पण ३० वर्ष राहूनही मला अमेरिका समजली आहे का? उत्तर सोपं आहे, "नाही". 

माझ्यासारखे लोक जेव्हा येतात, तेव्हा ते प्रामुख्याने शहरात किंवा उपनगरात राहतात. हा एक मोठा बबल आहे. आपण जेव्हा म्हणतो की हिंदुस्थानामध्ये इंडिया आणि भारत असे दोन देश आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेत शहरी आणि ग्रामीण असे दोन देश आहेत. शहरी भाग प्रामुख्याने डेमोक्रॅटिक आहे, उरलेला रिपब्लिकन आहे. धर्माचा पगडा भरपूर आहे, विशेषतः ग्रामीण अमेरिकेत. वर्णद्वेष आहेच आहे. त्याच प्रमाण शहरात खूपच कमी आहे, किंवा जवळ जवळ नाहीच. ग्रामीण भागात भरपूर. अर्थात वर्णद्वेष हा आपल्याला नवीन नाही. स्पष्टच सांगायचं झालं तर वर्णद्वेष, जातीद्वेष वगैरे गोष्टींमध्ये आपण कुठेही कमी नाही! 

भिडे सरांना इथल्या शिक्षण पद्धतीत इंटरेस्ट आहे. त्याबद्दल थोडं लिहितो. 

शिक्षण पद्धतीमध्ये गुण पण आहेत आणि दोष पण आहेत. मुख्य गुण म्हणजे निदान ७वी किंवा ८वी पर्यंत तरी विद्यार्थी परीक्षेकरता वेड्यासारखा अभ्यास करत नाहीत. दुसरा गुण म्हणजे तुम्हाला पुन्हा सुरुवात करता येते. एक उदाहरण देतो. माझा एक सीनियर कलीग होता. एकदा कधीतरी आम्ही कंपनीतून संध्याकाळी एक प्रोजेक्ट चांगला झाला म्हणून बिअर बारमध्ये गेलो होतो. तिथे सहज विषय निघाला म्हणून तो म्हणाला, विवेक तुला माझा भूतकाळ माहितीच नाहीये. आता हा माणूस आमचा सॉफ्टवेअर आर्किटेक्ट होता. अतिशय हुशार, केव्हाही मदत करायला तयार. मला वाटलं थापा मारतोय. काय असणार असून असून भूतकाळ? तर हा माणूस शाळेत अत्यंत हुशार. पण व्रात्य. मग शाळा सोडली. ड्रग्स च्या वाटेला लागला. काही काळ सॅन फ्रांसिस्को मध्ये हिप्पी लोकांच्यात रस्त्यावर राहिला. मग जवळ ड्रग होते म्हणून तुरुंगात गेला. तिथे त्याला साक्षात्कार झाला की आपलं गणित आणि विज्ञान फारच उत्तम आहे. बाहेर आला, पुन्हा शिकायला लागला. आणि आमच्या कंपनीमध्ये प्रमुख सॉफ्टवेअर आर्किटेक्ट झाला. आता हे भारताच्या शिक्षण पद्धतीत शक्य नाही. 

परंतु इथे हाय स्कूल मध्ये खूपच जास्त ताण असतो. इतका अभ्यास मी दहावी, बारावी आणि इंजिनीरिंगच्याही कुठल्याही वर्षी केला नसेल. आपल्याकडे ज्याप्रमाणे physics, chemistry हे विषय तीन वर्षे ओळींनी शिकवले जातात तसं न करता एका वर्षीं एकाच विषय पूर्ण शिकवतात. उदाहरणार्थ: नववी मध्ये फक्त physics, दहावीत chemistry इत्यादी. पण ही पद्धत चुकीची आहे. हे विषय म्हणजे isolated चेम्बर्स नसून ते एकमेकांशी निगडित आहेत. अतिशय हुशार मुलं हे पचवू शकतात. पण बाकीच्या मुलांना जड जात. 

कॉलेज मध्ये पण जास्त फ्लेक्सिबिलिटी असते. अशा प्रकारची फ्लेक्सिबिलिटी IIT मध्ये बऱ्याच प्रमाणात आहे. आमच्या ओळखीची एक फॅमिली आहे. त्यांची  दोन्हीही मुलं अतिशय हुशार. आणि विद्यार्थी, परीक्षार्थी नव्हे. त्यातला एक बर्कली मध्ये गेला. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली. ४ वर्षाचा अभ्याक्रम ३ वर्षात पूर्ण केला. शिवाय उरलेल्या वर्षात MS पूर्ण करून चौथ्या वर्षी PhD चालू केली. आपल्या कुठल्याही संस्थेत हे शक्य नाही (हा मजकूर लिहून झाल्यावर मी लोकसत्तेत बातमी वाचली की ही प्रोसेस आपल्याकडे आता विचाराधीन आहे!) 

आता थोडं भौतिक सुविधांबद्दल. ३० वर्षांपूर्वी आम्ही आलो, किंवा आमच्याही आधी जे लोक आले त्यांना भौतिक सुविधांमधला फरक फार मोठया प्रमाणावर जाणवला. आता तो इतका उरला नाहीये. आता सांगून खरं वाटणार नाही की आम्ही इथे आलो तेव्हा भारतात फोन मिळण्याकरता वर्षानुवर्षे वाट पहावी लागे. ते नको असेल तर Own Your Telephone या उपक्रमात पैसे भरावे लागत. म्हणजे वर्षांच्या ऐवजी काही महिन्यात (!) फोन मिळे, तो देखील उपकार केल्यासारखा! त्या वातावरणातून आल्यावर इथे अर्थातच फरक जाणवणारच. शिवाय सार्वजनिक शिस्त, हॉर्न न वाजवणे वगैरे तर आहेच. हॉर्न तर कित्येक महिन्यातून एकदा वाजवला जातो. तो ही अगदी जरूर पडली तरच. 

कामाच्या पद्धतीत सुद्धा पुष्कळ फरक आहे. आपल्या बॉसला question करणं यात फारसं वावगं मानलं जात नाही. सांगकामेपणा करणारे लोक नाहीत  असं नाही, पण कमी. काम झाल्याशी मतलब. ते सर्व चांगलंच आहे. शिवाय भारताला पण कॅपिटॅलिझम चे फायदे आता कळलेले आहेत. परंतु "अति सर्वत्र वर्जयेत" या न्यायाने अतिरिक्त  कॅपिटॅलिझमचे तोटे पण आहेत. आणि ते गेल्या वर्षी प्रकर्षाने दिसून आले. एखाद्या कंपनीवर सरकारचं अगदी नाममात्र नियंत्रण असेल (किंवा नसेलच) तर तोटेपण होतात. ते असे की त्या त्या कंपनीचा CEO फक्त  नफा वाढवणे याकडेच लक्ष देतो. मग चार पैसे वाचताहेत तर चला चीनकडे आणि करा तिथे उत्पादन हा विचार होतो. पण त्यावर नियंत्रण नसेल तर १०० टक्के production तिथे जातं. आणि हजारो कंपनीचे हजारो CEO हाच विचार करतात तेव्हा देशाचं नुकसान होत. short टर्म फायदा होऊ शकतो. पण लॉन्ग  टर्म  नुकसानच होतं. हा लॉन्ग टर्म विचार CEO करीत नाही, कारण त्याचं जॉब डिस्क्रिप्शन ते नाही. त्यावर सरकारचं थोडं तरी नियंत्रण असेल तर हे होत नाही. मग हजारो कंपन्यांना झक्कत काही टक्के उत्पादन स्वदेशात करायला लागतं.

मला असं नेहमी वाटत की काम करण्याचं स्वातंत्र्य ही टॅलेंट अमेरिकेत येण्याकरता घडलेली मोठी गोष्ट आहे. एखादी कंपनी "बॉस आणि subordinates" या पद्धतीने चालवणं ही एक गोष्ट झाली. परंतु लोकांना स्वातंत्र्य देऊन चालवली तर ती जास्त फायदेशीर होते. शिवाय लोकं स्वतःची creativity वापरून नवीन गोष्टी करतात. हे महत्वाचं आहे. केवळ मी बॉस आहे, म्हणून मला सगळं कळतं, आणि माझा बॉस हा माझा बॉस आहे म्हणून त्याला माझ्यापेक्षा जास्ती कळतं हा वाईट दृष्टिकोन आहे. लष्कर चालवायला हे ठीक आहे. पण कंपनी चालवायला नाही. एक उदाहरण घेतो. माझ्या टीम मध्ये एक अतिशय गुणवान सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. जवळ जवळ १५ वर्ष. माझा आणि त्याचा दिवस ५ तासाच्या फरकाने चालू व्हायचा. मी लवकर उठणारा तर हा सुशेगात. पण तरीसुद्धा कामाच्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम नाही. मी घरी जाताना तो कामावर आहे, की नाही हा विचार माझ्या डोक्यात नसे. आणि माझा बॉस पण याच विचारसरणीचा. भारतात बॉस निघेपर्यंत आपण बसून राहायचं हे कल्चर मला पटत नाही, आणि इथे ते मुळीच नाही. 

आता ट्रॅक बदलून थोडंसं राजकारणाबद्दल. अर्थात ट्रम्प आणि त्याचं राजकारण याबद्दल आता खूपच माहिती उपलब्ध आहे. भारताच्या तुलनेत बघायचं झालं तर. फक्त दोनच मुख्य पक्ष. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. डेमोक्रॅटिक शहरी भागात आणि रिपब्लिकन ज्याला इंटिरिअर अमेरिका म्हणतात तिथे. त्यातही डेमोक्रॅटिक जास्ती प्रागतिक विचाराचे मानले जातात. परंतु रिपब्लिकन लोकांच्या सरकारचं आर्थिक धोरण जास्त चांगलं मानलं जातं.  आता भारताचे मित्र कोण हा सहज पडलेला प्रश्न. त्यावर ट्रम्प भारताचा मित्र आहे वगैरे बऱ्याच लोकांना वाटतं. पण खरं सांगायचं झालं तर कोणीच नाही. ट्रम्प तर नाहीच नाही. जिथे फायदा तो मित्र हा सरळ विचार आहे. अमेरिकेत शस्त्रास्त्रांचे कारखाने आहेत. त्यांना काम आणि नफा पाहिजे. जो शस्त्र विकत घेईल तो मित्र. जो विकत घेत नाही, किंवा दुसरीकडून घेतो तो शत्रू. सरळ आणि साधं लॉजिक आहे.  मी मागे म्हणल्याप्रमाणे डेमोक्रॅटिक पक्ष प्रागतिक आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने गे आणि लेस्बियन लोकांना बऱ्याच सवलती दिल्या. त्यांना लष्करात दाखल होण्याची परवानगी दिली. कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर भेदभाव होऊ शकत नाही असे नियम केले. 

आता विषय निघाला आहे तर गे आणि लेस्बियन लोकांबद्दल मत प्रदर्शन करायला हरकत नाही. हा तसा वर्ज्य विषय आहे, निदान भारतात तरी. इथेदेखील माझे कित्येक मित्र हा विषय टाळतात. अगदी नवीन नवीन आलो होतो तेव्हा इथे गाला नावाच्या संस्थेचा बोर्ड दिसला. आमच्या वर्गात गाला नावाचा आमचा मित्र होता. त्याच बाजारात बुटांच दुकान होतं. मला वाटलं, अरे वा, गुजराती लोक जगभर पोचले आहेत. आणि इथे तर त्यांनी संस्थाच काढली! मग काही दिवसांनी उलगडा झाला, की ही गे अँड लेस्बियन असोसिएशन आहे. त्यानंतर समजलं की ज्यांच्याबरोबर मी कित्येक वर्ष काम केलं होत ते माझे काही कलीग गे किंवा लेस्बियन आहेत. नंतर अजूनही भारतीय मित्र मिळाले, ते गे होते, आणि आहेत. उच्च विद्या विभूषित आहेत (आय आय टी मध्ये शिकलेले). आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट: ते आपल्यासारखेच लोक आहेत. मग माझा दृष्टिकोन बदलत गेला. मुळातही घरी वडील एअर फोर्स मधले असल्यामुळे जाती पातींपासून दूरच होतो. कारण सैनिक लढायला पुढे जातो तेव्हा त्याचा सहकारी कुठल्या जातीचा आहे त्याचा तो विचार करीत नाही! आता असं समजलं की एखाद्या व्यक्तीच हे ओरिएंटेशन हे त्याची वैयक्तिक बाब आहे, आणि ती नैसर्गिक आहे. जितक्या सहजतेने आपण एखादा माणूस उंच आहे आणि एखादा बुटका आहे हे स्वीकारतो, किंवा एखादा माणूस डावरा आहे हे स्वीकारतो  त्याच सहजतेने हे देखील स्वीकारलं. अर्थात या गोष्टीत एकमत तर सोडाच ५०% सुद्धा पटण्याची शक्यता नाही. आणि अर्थात कुणाला हे नाही पटलं तर माझा काहीच आक्षेप नाही. इथेसुद्धा मी बघतो की भारतीयांची दुसरी पिढी या बाबतीत जास्ती सहिष्णू आहे. लष्कर आणि गे लोकं ही तर गम्मतच आहे. अलेक्झांडर हा गे होता हे अनेक पुराव्यांवरून ज्ञात आहे. आता तो जर गे असूनही इतके विजय मिळवतो तर गे लोकांना लष्करात प्रवेश का नसावा! 

आता शेवटी इथल्या अध्यक्षीय निवडणुकीबद्दल. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर सत्तापालट होताना अमेरिकेच्या इतिहासात कित्येक दशकांनी शांतीपूर्ण सत्तापालट न होता हिंसाचार झाला. रिपब्लिकन पक्ष, किंवा आपण ट्रम्प म्हणू, कोर्टात दाखल केलेले सर्व खटले हरला. त्यामुळे लोकशाही बळकट आहे हे सिद्ध झालं. त्यातले कित्येक न्यायाधीश ट्रम्प यांनीच नियुक्त केलेले होते.  असाच प्रकार इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावून केला होता तेव्हा भारतानेसुद्धा आपली लोकशाही किती बळकट आहे हे दाखवून दिलं होतं. 

इथे अध्यक्षीय निवडणूक फारच गोंधळाची आहे. 

मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना आम्हाला  इंजिनिअरिंग ड्रॉईंग हा विषय होता. वर्गात ५५ विद्यार्थी. आमच्या प्रोफेसर ने सबमिशन करता पाच तुकड्या पाडल्या. रोल नंबर १, ६, ११ .... अशी पहिली, त्याला A म्हणू. रोल नंबर २, ७, १२ ... अशी दुसरी त्याला B म्हणू, इत्यादी. पण दुसऱ्या वर्षीचा वर्ग तसा एकदम पक्का होत नाही. लवकरच काही मुलं production engineering ला गेली. मग त्यांनी त्या मुलांच्या जागा भरून काढल्या आणि त्या तुकड्यांना A', B' अशी नाव दिली. पण लवकरच पुण्याचं कॉलेज, सांगलीच, गोव्याचं इथून काही मुलं नवीन आली. मग त्यांच्याकरता A'', B'' अशा तुकड्या निघाल्या. काही समजलं का? शेवटी गोळाबेरीज अशी झाली की प्रोफेसर सकट हे कोणालाच न समजल्याने ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे ड्रॉईंग काढलं, सबमिट केलं आणि मार्क पण मिळाले. =

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ज्यांनी डिझाईन केली त्याचा हा माणूस खापरपणतु असावा असा माझा बळकट तर्क आहे. 

भारताचं उदाहरण घेऊन ही प्रोसेस कशी चालते ते पाहू. समजा भारतात तीनच राज्य आहेत, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड. महाराष्ट्राला ५० मतं आहेत, उत्तर प्रदेशाला ५० आहेत आणि झारखंडला ५. आता जी पार्टी ते राज्य जिंकेल त्यांना सगळी मतं मिळणार. मग भले ते एका मताच्या फरकाने जिको वा एक लाख मतांच्या फरकाने. आणि समजा (म्हणजे खरोखरच समजा, खूप कठीण आहे!) की महाराष्ट्र काँग्रेसने जिंकलं आणि उत्तर प्रदेश भाजप. तर मग देशाचा अध्यक्ष झारखंडसारखं छोटं राज्य ठरवणार! तर हे असं इथे होतं. गेल्या दोन्ही निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला खरं बहुमत  नव्हतं. पण पहिल्या निवडणुकीत या विचित्र पद्धतीमुळे रिपब्लिकन प्रेसिडेंट झाला. दुसऱ्या, म्हणजे आत्ताच्या निवडणुकीत तसं झालं नाही. ही पद्धत मुळातच चूक आहे. एक व्यक्ती एक मत याला काही अर्थ उरत नाही. माझ्या माहितीचे, इथे राहणारे जे रिपब्लिकन मतदार आहेत त्यांच्या  मतांची किंमत शून्य आहे. कारण इथून डेमोक्रॅटच जिंकतो. टेक्सस मधल्या डेमोक्रॅटिक मतदारांची हीच स्थिती आहे. 

आमच्या लहानपणी एक मासिक यायचं. विचित्र विश्व! मला न समजलेली अमेरिका म्हणजे हेच. विचित्र विश्व. 

भिडे सर, वर्षा रिसबूड-करंबेळकर, गिरीष कंदलकर, श्रीधर काणे  यांनी लेखाचा मसुदा वाचून केलेल्या सूचनांप्रमाणे लेख सुचत गेला. अर्थात त्यांचे आभार वगैरे मानायचा प्रश्नच उद्भवत नाही. भिडे सरांचे मी काय आभार मानणार? त्यांनी शिकवलं म्हणून आम्ही आहोत. बाकी सर्व मित्र/मैत्रिणी आहेत. 

फार लांबलेला लेख आता संपवतो.  

Comments

  1. छान लेख आहे विवेक 👌👌

    ReplyDelete
  2. Excellent blog, Vivek dada! Throughly enjoyed reading it. You covered all the pros and cons of this country well

    ReplyDelete
  3. विवेक, खूपच छान आणि प्रवाही भाषेत लिहिलंयस.

    ReplyDelete

Post a Comment