पटवर्धन बाई त्यांचा विषय बायोलॉजी. मला पहिली संधी मिळाल्या मिळाल्या मी तो सोडला! अर्थात तो त्यांच्यामुळे नव्हे. कारण त्यांचं शिकवणं होतं म्हणून पासापुरते मार्क मिळू शकत होते. परंतु सेल, बेडूक (पुलंचे रावसाहेब जसा प्राचीला गच्ची शोधत होते, त्याप्रमाणे बेडूकला हाडूक हे यमक बरोबर जमेल!), मेम्ब्रेन, प्लाझ्मा, मायटोकोण्ड्रिया, न्यूक्लिअस आणि अनंत न कळणाऱ्या गोष्टी या विषयात होत्या. यात आपण काहीही करू शकणार नाही (नापास होणं मात्र जमेल) ही खात्री पटल्यामुळे मी मुकाटपणे टेक्निकलला प्रवेश घेतला. त्यांचा विषय सोडल्यामुळे असेल कदाचित, पण मी त्यांचा आवडता होतो हे निश्चित. अतिशय हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व. शिकवायची उत्तम हातोटी, चपखल उदाहरणं आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद म्हणजे पटवर्धन बाई. मला आठवणारी एक गोष्ट म्हणजे पिरिअड संपताना बाई अवांतर माहिती द्यायच्या. आणि सांगायच्या, की हे पुस्तकात नाहीये, परीक्षेला पण येणार नाही पण मी सांगते. पण गम्मत म्हणजे मला तरी या अवांतर गोष्टीच स्पष्टपणे लक्षात राहायच्या. मी शाळेत असतानाच त्यांनी मला श्रीधर काणे बद्दल सांगि...