सरस्वती: आहे मनोहर तरी!
सरस्वती: आहे मनोहर तरी! विदर्भ साहित्य मंडळाने दिलेला पुरस्कार प्रसिद्ध कवी श्री यशवंत मनोहर यांनी नाकारला! बर नाकारला तर नाकारला, मला नको बुवा तुमचा पुरस्कार असं पहिल्यांदाच सांगितलं असतं तर शांतपणे तो दुसऱ्या कोणालातरी देता आला असता (माझं नावही त्या यादीत होतं, जरा खाली होतं, पण होतं... जाऊदे). पण तसं काही न होता तो जाहीररीत्या नाकारला. आणि मग त्यावर मोठीच खळबळ उडाली (किंवा खळबळ उडून राहिली आहे). माझ्या मते तो पुरस्कार मला देता आला नाही ही यातली सगळ्यात खळबळजनक गोष्ट, पण असो. आणि यामध्ये त्यांनी खुद्द सरस्वतीला ओढलं. म्हणजे गुप्त झालेली नदी नव्हे, खरीच. शाळेत असताना पाटीवर काढतो तीच. मग मी जाऊन त्यांची मुलाखत बघितली. तर गम्मत म्हणजे त्या मुलाखतीत मुख्य मुद्द्याला हातच घातला नाहीये. स्वतःची प्रतिमा काय आहे यावर बरीच चर्चा आहे (प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणतात ती हीच का?). शिवाय स्वतःची तब्येत, खाणं/पिणं. आणि पिणं नाहीच, कारण मला काहीही व्यसन नाही असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे (पुरस्कार परत करणे हे व्यसन असू शकतं का, एक शंका). न पिणारा एकमेव साहित्यिक ...