पटवर्धन बाई

 पटवर्धन बाई 

त्यांचा विषय बायोलॉजी. मला पहिली संधी मिळाल्या मिळाल्या मी तो सोडला! अर्थात तो त्यांच्यामुळे नव्हे. कारण त्यांचं शिकवणं होतं म्हणून पासापुरते मार्क मिळू शकत होते. परंतु सेल, बेडूक (पुलंचे  रावसाहेब जसा प्राचीला गच्ची शोधत होते, त्याप्रमाणे बेडूकला हाडूक हे यमक बरोबर जमेल!), मेम्ब्रेन, प्लाझ्मा, मायटोकोण्ड्रिया, न्यूक्लिअस  आणि अनंत न कळणाऱ्या गोष्टी या विषयात होत्या. यात आपण काहीही करू शकणार नाही (नापास होणं मात्र जमेल) ही खात्री पटल्यामुळे मी मुकाटपणे टेक्निकलला प्रवेश घेतला. 

त्यांचा विषय सोडल्यामुळे असेल कदाचित, पण मी त्यांचा आवडता होतो हे निश्चित. 

अतिशय हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व. शिकवायची उत्तम हातोटी, चपखल उदाहरणं आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद म्हणजे पटवर्धन बाई. मला आठवणारी एक गोष्ट म्हणजे पिरिअड संपताना बाई अवांतर माहिती द्यायच्या. आणि सांगायच्या, की हे पुस्तकात नाहीये, परीक्षेला पण येणार नाही पण मी सांगते. पण गम्मत म्हणजे मला तरी या अवांतर गोष्टीच स्पष्टपणे लक्षात राहायच्या. 

मी शाळेत असतानाच त्यांनी मला श्रीधर काणे बद्दल सांगितलं होतं. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष भेटण्यापूर्वीच मला तो माहित होता. बाई श्रीधर बद्दल खूपच बोलायच्या. पुढे गेल्यावर VJTI मध्ये मैत्री तर झालीच, परंतु माझ्या आयुष्याचा turning point श्रीधर असेल हे मला शाळेत कळणं शक्यच नव्हतं. परंतु श्रीधरने मला IIT Gate परीक्षेची जी गुरुकिल्ली दिली त्यामुळेच मी तीन आठवड्याच्या अभ्यासावर IIT मुंबईमध्ये जाऊ शकलो. 

ज्या विषयात मला अजिबात गती नव्हती, तो विषय आता मात्र मला इंटरेस्टिंग वाटतो. ठाण्यात आलो की बाईना भेटणार, आणि अकरावीची बायोलॉजी शिकायचा प्रयत्न करणार. बाईंच्या कृपेमुळे ३५ मार्क मिळतीलच!

- (अ)विवेक 

Comments

  1. पटवर्धन बाई...माताजी
    वेगळं वाटत असेल न ऐकायला.पण खरच त्या माताजी प्रमाणेच प्रेमळ आणि साधी राहणी , उच्च विचारसरणीच्या आहेत.आपले कोणतेही problems त्यांना सांगावं आणि आपण निवांत व्हावं .अस हक्काचं आणि आदरणीय व्यासपीठ म्हणजे पटवर्धन बाई.
    बाई उत्तम जीवशास्त्रआच्या अध्यापिका तर आहेतच पण त्याच बरोबर अध्यात्मिक देखील आहेत.वाचनाचा दांडगा व्यासंग आहे. रामदासांच्या जीवन कार्याविषयी सखोल अभ्यास आहे.अत्यंत रसाळ भाषेत त्या विषयी जेव्हा त्या बोलतात तेव्हा मंत्र मुग्ध होउन जातो.बाई उत्कृष्ट लेखन करतात,चवीचे पदार्थ ( मामा काणे यांची बहीण असल्याने ) करून खायला घालतात.
    उत्तम रांगोळ्या काढतात. फळ्यावर हुबेहूब विज्ञानाच्या आकृत्या काढत.अक्षर तर इतकं वळणदार आणि सुंदर आहे की पाहतच रहावं.
    कोणत्याही कार्यक्रमाचं परफेक्ट नियोजन कसं करायचं हे त्यांच्या कडूनच शिकावं.
    आज ठाण्यातील किंवा ठाण्याबहेरील बहुसंख्य डॉक्टर्स पटवर्धन बाई न चे नाव आदराने घेतात आणि केवळ बाई न च्या एका फोन कॉल वर कोणाच्याही मदतीला तत्पर असतात.
    प्रेमाचा आणि मायेचा अखंड झरा
    म्हणजे आमच्या पटवर्धन बाई.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Is Test Cricket Changing? Yes

यमन

मला न समजलेली अमेरिका