यमन
माझं एक स्वप्न आहे. ते पूर्वी खूप वेळा साकार झालं आहे, पण तरीही अजूनही ते स्वप्न आहेच कारण आता ते साकार व्हायची शक्यता कमीच आहे.
पावसाळ्याचे दिवस असावेत. साधारण गुरु पौर्णिमेच्या वेळेचे. साडे नऊचा प्रोग्रॅम. जेवण करून आरामात सगळे लोक यावेत. सभागृहाच्या दारावरच कोणीतरी अत्तरदाणी घेऊन उभं असावं. पानाचं तबक फिरत असावं. त्यात पान, सुपारी, कात, लवंग आणि चुना. बास. आमच्या लहानपणी तंबाखू त्यात नसायची. ती डबी मोठे लोक आपापली ठेवायचे. मी अत्तरही लावून घेत नाही, किंवा पानही खात नाही. अजूनसुद्धा. पण अत्तरदाणी आणि तबक असल्याशिवाय कार्यक्रम होतो हेच पटू शकत नाही.
कोणीतरी तब्येतीत गाणारा गायक/गायिका असावी. तबल्यावर सुंदर ठेका देणारा, नेहेमीचा तबलजी. आणि ट्रबलजी नव्हे! संयत साथीची संवादिनी. छोटा विस्तार करून, विलंबित एकतालातली बंदिश चालू व्हावी. एक सुंदर तुकडा घेऊन तबलजीने सम द्यावी.
आणि शांतपणे यमन चालू व्हावा.
आमच्या लहानपणी हे कित्येक वेळा अनुभवलं आहे. पण आता तो माहौल नाही. कोरोना आत्ता आहे, पण तो जाईल. परंतु त्याही आधी सेक्युरिटी मुळे रात्रीचे कार्यक्रम बंद झाले. अजूनही उत्तम गायक/गायिका आहेत. ट्रबलजींचा सुकाळ असला तरीही अस्सल, तयार तबलजी पण आहेत (त्यांची कितीही उत्तम तयारी असली तरी ते सुंदर, डौलदार ठेका धरतात), संयत साथ करणारे संवादिनी वादक पण आहेत. पण माहौल नाही, आणि त्यात त्यांचा काही दोष नाही.
आता गुरु पौर्णिमा जवळ आली आहे म्हणून हे आठवलं.
असो, कालाय तस्मै नमः
Comments
Post a Comment