माझं ठाणं. ४० पेक्षा जास्ती वर्षांपूर्वीचं
हा लेख किंवा ब्लॉग लिहायची मुख्य कारण दोन तीन आहेत. परममित्र प्रसाद गांगल यांनी आमच्या मो ह विद्यालयाच्या ग्रुप वर "दिसामाजी थोडे लिहावे", या धर्तीवर "मासामाजि थोडे लिहावे", म्हणजे महिन्यातून एकदा तरी लिहावे, अशी आज्ञा केली. ती तर पाळायलाच पाहिजे.
शिवाय असं आहे, की काही महिन्यांपूर्वी भिडे सरांनी अशी उत्तम लेखमाला सुरु केली होती. त्यांनी अचानक थांबवली.
एक जुनी गोष्ट आहे. भूगंधर्व रहिमत खान साहेब, हे विष्णुपंत छत्रे यांच्याकडे राहत असत. पण त्यांनी गाणं बंद केलं होतं. त्यावर विष्णुपंतांनी बरोब्बर उपाय शोधला. ते रोज सकाळी तंबोरा लावून वेडेवाकडे गात असत. मग न राहवून रहिमत खान साहेब गायला लागत. त्याचप्रमाणे भिडे सरांना माझा राग येईल, आणि संतापाने ते त्यांचं लिखाण चालू करतील अशी आशा आहे!
त्याशिवाय मला स्वतःला चरई मध्ये (तेव्हा) राहण्याऱ्या कमीत कमी ५ ते १० व्यक्ती माहित आहेत, की त्या सुंदर लिहू शकतील! सर्व दोंदे लोकं, शरद गुप्ते हे सहज सुचलेली नावं. त्यापैकी एक व्यक्ती तर (मी नाव सांगत नाही, पण संदीप भागवत ची आई!) अतिशय सुंदर लिहू शकणार आहे. माझं वेडं वाकडं लिखाण बघून त्यांना लिहावंसं वाटावं ही आशा
मी इयत्ता तिसरी मध्ये ठाण्याला आलो. ७० साली. तेव्हा बेडेकर विद्या मंदिरात प्रवेश घेतला. तिसरीला पंडितराव बाई, चौथीला सराफ बाई. पंडितराव बाईंचा परिचय म्हणजे आयुष्यातला मोठा योग! ठाण्यात असेपर्यंत मी आणि श्रीकांत राजे दार दसऱ्याला त्यांच्या कडे जायचोच.
आमचं घर तीन पेट्रोल पंप जवळ. त्या वेळच ठाणं म्हणजे रंगायतन आणि तरण तलाव नव्हताच. आत्ता जिथे श्रद्धा वडेवाला आहे तिथून घंटाळी देवीच्या मंदिरा पर्यंत कच्चा रस्ता होता. घंटाळी सोसायटी व्हायची होती. आराधना व्हायचं होतं. अर्थात आता ते ही नाही. पाच पाखाडी होती, परंतु तिथे जाणं अवघड होतं. हाय वे फारच लांब वाटायचं.
एकूण ८ वाजता "सारं कसं शांत शांत" व्हायचं.
तळ्यावर काहीच गर्दी नसायची!!!! आणि राम मारुती रोड ८ वाजता सुनसान व्हायचा. हो, आणि आत्ता जिथे गजानन महाराज मंदिर आहे, तिथे तो संपायचा.
त्याच वेळी मी व्यायाम शाळेत दाखल झालो. माझी खेळातली प्रगती (?) ही केवळ दैदिप्यमान अशीच होती. परंतु खेळात ढ असलेल्या खेळाडूला काढून टाकण्याची प्रथा व्यायाम शाळेत नसल्यामुळे मी टिकून राहिलो, आणि त्यामुळेच सख्खे मित्र मिळाले.
तेव्हा वैद्य सरांचा गाण्याचा क्लास पॉप्युलर होता. मी आणि ताई दोघेही तिथे काही काळ गेलो. शिवाय शेलार बाईंचा सुद्धा. त्यानंतर मी काळे सरांकडे व्यवस्थित स्थिरावलो.
तिसरी/चौथी मधले मित्र म्हणजे मनोज वाकडे, श्रीकांत राजे, दिलीप लोंढे, संतोष ताम्हाणे. मो ह विद्यालयाबद्दल नंतर सविस्तरच लिहीन.
ठाणं छोटेखानी होतं. शांत होतं. सुसंस्कृत होतं (अजूनही आहे). आणि माझ्या शहराचा मला अभिमान आहे.
Comments
Post a Comment