कालाय तस्मै नमः

 कालाय तस्मै नमः 

मी ठाण्याबद्दल जो लेख लिहिला होता त्यावरच्या प्रतिक्रिया माझ्या अपेक्षेच्या बाहेर होत्या. त्यामुळे मी पुढचा लेख लिहिण्याचं धाडस करतोय. आधीचा लेख इथे सापडेल https://www.facebook.com/vivek.datar.1/posts/10217846780832184 किंवा इथे https://www.blogger.com/blog/post/edit/8356575417697978971/38693657072159533

तेव्हाच्या कित्येक खाणा खुणा आता काळाच्या ओघात नाहीशा झाल्या आहेत. सरवट्यांचा बंगला राम मारुती रोड वर होता. आता तिथे मोठी इमारत आहे. हेगड्यांचा बंगला तळ्याच्या कॉर्नर ला होता. तोही नाही. कल्पना केंद्र आता केवळ जुन्या लोकांच्या आठवणीत अस्तित्वात आहे. आईस फॅक्टरी मध्ये खरोखरच आईस मिळायचा. तो घेऊन, आणि आईसक्रीम चा पॉट भाड्याने आणून आईस क्रीम करणे हा उन्हाळ्यातला तीन चार वेळेचा कार्यक्रम असायचा. आता आईस क्रीम सर्रास कुठेही मिळतं. कालाय तस्मै नमः. 

मामलेदार मिसळ खरोखरच मामलेदार कचेरीला लागून होती. आता जुनी जागा अजून आहे की नाही हे माहित नाही. ७०च्या सुमाराला बबन सीताराम भागवत यांनी आत्ता जिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथे बटाटा वडा, सामोसा आणि वडा पाव विकायला सुरुवात केली. आता ते चालू आहे (नशीब!) पण दुसरीकडे आहे. खुद्द बबन आता नाही. पण वड्यांची चव थेट तशीच आहे. 

आराधना थिएटर बांधलं गेलं आणि पाडलं सुद्धा. काही वर्षांपूर्वी आम्ही जोरात एका रिक्षेवाल्याला आराधना टॉकिज म्हणून सांगितलं. तो बुचकळ्यात. मग त्याचा बराच उध्दार करून त्याला रस्ता दाखवला. बघतो तर आराधनाच्या इथे एक भला मोठा खड्डा होता! कालाय तस्मै नमः 

आमच्या शाळेच्या नव्या इमारतींबद्दल लिहायलाच पाहिजे. सहसा मो ह विद्यालयाच्या ग्रुप मध्ये एकमत होत नाही. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही भरपूर भांडतो. परंतु एक विषय मात्र असा आहे की सगळ्यांचं एकमत होतं. शाळा म्हणली की आम्हाला जुनी इमारतच आठवते. नव्या बिल्डिंग ला मो ह विद्यालय म्हणवतच नाही. जेव्हा नवीन इमारत झाली तेव्हा मी वेड्यासारखा आत जाऊन जुन्या कुठल्या गोष्टी तशाच आहेत हे बघून आलो! बेंच तसेच आहेत. शाळेचं स्टेज आणि ग्राउंड तसंच आहे. आणि ग्राउंड च्या जवळ एक छोटेखानी टपरी होती. नाटकाचा प्रयोग असला की तिथे चहा आणि वडा मिळायचा. ती तशीच आहे. माझ्यासारखाच हा उद्योग शाळेतल्या इतर मित्रांनी पण केला हे कळल्यावर निदान आपल्याला वेड लागलेलं नाही (अजून तरी) याची खात्री पटली. आता प्रगती म्हणली की जुनी इमारत जाणार हे होणारच. पण आमच्या शाळेची इंग्रजी C आकाराची बिल्डिंग हीच खरी. कालाय तस्मै नमः 

जांभळी/टेम्बी जांभळी/टेम्बी असा आरडा ओरडा करणारे टांगेवाले स्टेशनवर होते. आमच्या वर्गात एक मुलगा होता. नाव आठवत नाही. बहुतेक त्याच्या वडिलांचा टांगा असावा. हा भिडू शाळा बुडवून जांभळी/टेम्बी करत टांगा हाकायचा. रिक्षा नव्हत्याच. पहिली रिक्षा आली तेव्हा रिक्षाच्या मागे नाव लिहिण्याची प्रथा पडली. तेव्हाच वंदना टॉकीज झालं होतं. मला वाटतं पहिल्या रिक्षेचं नाव वंदना होतं. टांगे काळाच्या उदरात गडप झाले. पण बग्गीच्या रूपाने गेल्या काही वर्षात त्याचं पुनरुज्जीवन झालं आहे. परंतु तळ्यावरच्या गर्दीत, जिथे माणसालाही धड चालता येत नाही तिथे या बग्ग्या कशा काय धावतात देव जाणे. टांगेच खरे! कालाय तस्मै नमः 

ब्राम्हण सोसायटीत छोटे छोटे बंगले होते. आमच्या काळे गुरुजींचा सुंदर बंगला होता. त्यांच्या घरी त्याच बंगल्याचा १९३६ सालचा फोटो होता. शेताडी आहे, आणि त्यात हा एकच बंगला उभा आहे. आता मंगल ताईला विचारायला पाहिजे की तो फोटो अजून आहे का. आमचे गुरुजी सांगायचे की ब्राम्हण सोसायटीतून संध्याकाळी स्टेशनवर जायला, किंवा तिथून यायला भीती वाटायची. हातात काठी घेऊन ती आपटत आपटत जायचं. कोणी येणार असेल तर त्यांना आणायला जात असत. भीती आता पण वाटते. पण ती म्हणजे गोखले रोडवर आपण बहुतेक चिरडून मरणार याची. हो, आणि कोणे एके काळी गोखले रोड ८ नंतर सुनसान असायचा. आणि शिवाय तो केव्हाही क्रॉस करता यायचा. आता क्रॉस करायचा म्हणजे "रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग".   कालाय तस्मै नमः 

माझ्याहून जुने लोक ठाण्यात खूप आहेत. प्रत्येक पिढीच्या आठवणी वेगळ्या. आणि स्मरणरंजन ही केव्हाही आवडणारी गोष्ट. तर त्यांनी पण लिहाव्यात ही विनंती. शेवटी काय, कालाय तस्मै नमः हे तर आहेच. 


Comments

Popular posts from this blog

Is Test Cricket Changing? Yes

यमन

मला न समजलेली अमेरिका