मो ह विद्यालय

 मो ह विद्यालय 

आपल्या शाळेविषयी प्रेम नसलेला माणूस क्वचितच सापडेल. त्यातून माझ्यासारख्याची केस अजूनच वेगळी. मीच नाही, तर आमची १९७८ सालाची बॅच वेगळी होती हे निश्चित. आम्ही सगळे संपूर्णपणे outstanding विद्यार्थी होतो. अतिशय अभ्यासू, प्रामाणिक, कष्टाळू, कामसू, प्रेमळ होतोच. प्रत्येक विद्यार्थी सकाळी ४ वाजता उठून गृहपाठ करीत असे! 

असो, आता खरं काय ते सांगतो. आमची बॅच ही गणित/शास्त्र हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकणारी पहिली बॅच. हा pattern आला तेव्हा आम्ही नववीत होतो. अर्थात तेव्हा दहावीत असलेले विद्यार्थी पण eligible होते. पण एकदम दहावीत हा बदल कुणी केला नाही. आमची बॅच आणि १९७९ ची बॅच या दोन वर्गांनी हा बदल स्वीकारला. त्यातून आम्हाला आठवीच वर्ष न मिळाल्यामुळे शिक्षकांनी खूपच जास्ती मेहेनत घेतली. 

सर्वश्री विलास जोशी, तामरस, खोल्लम, भिडे, सुबोध देशपांडे, पटवर्धन बाई या आणि इतर अनेकांनी त्यावेळेला अतिरिक्त वर्ग घेतले. आणि आताच्या जमान्यात हे ही सांगायला पाहिजे की हे अतिरिक्त वर्ग घेताना फक्त विद्यार्थ्यांविषयी तळमळ ही एकच गोष्ट त्यांच्या मनात होती. इतर कुठलाही फायदा, आर्थिक किंवा व्यावहारिक, असा त्यांनी काय पण इतरही कोणी शिक्षकांनी कधीच पाहिला नाही. 

आम्ही दहावीच्या वर्गात असताना दोन मोठ्या घडामोडी घडल्या. तेव्हा शिक्षकांचा संप झाला, आणि त्यामुळे परीक्षा मे महिन्यापर्यंत लांबली. दुसरी घडामोड म्हणजे आम्हाला इंग्रजी माध्यमातून प्रश्नपत्रिका देण्याची व्यवस्थाच झाली नव्हती. तेव्हा सामंत सरांनी आम्हाला सांगितलं की या बाबतीत विद्यार्थ्यांनी काही काळजी करायची गरज नाही. आम्ही हा प्रश्न सोडवू. आणि तसच झालं. माझा नंबर होली क्रॉस मध्ये आला होता (अरे, अरे! या फक्त मुलींच्या शाळेत जायला मिळालं, पण कधी, तर एकही त्या शाळेची मुलगी तिथे येणार नसेल तेव्हा! काय हा दैवदुर्विलास) 

पुढे मी आणि माझी काही मित्र बारावीपर्यंत शाळेतच राहिलो, आणि अजूनच special treatment पदरात पडली! 

पाचवीत प्रशांत राजे हा माझा पहिला बेंच सवंगडी. तिथून पुढे शाळेने अनेक जिवाभावाचे मित्र दिले. आजही शाळेचा मित्र ही एकाच उपाधी आम्हाला जवळ आणते. शाळेत असताना जे संबंध जुळतात त्यांच्या आड नंतर कुठलीच गोष्ट येत नाही. समाजातील तथाकथित स्थान, पैसे, जात-पात वगैरे वगैरे सगळं १०० टक्के झूट आहे. 

आता आमच्या वर्गातल्या मुलींबद्दल लिहितो. ..... असो, जाऊदे! उगीच नको त्या जखमा पुन्हा उघड कशाला करा. जास्ती खोलात "न शिरणेमेही समझदारी हैं" 

शाळेविषयी अजून पुन्हा कधितरी. माझ्या वर्गमित्रांनी आणि मैत्रिणींनी लिहिले तर सगळ्यांना आवडेलच. 

 

Comments

  1. विवेक,काय छान लिहितो आहेस.असेच लिहित रहा.दहावीच्या महत्त्वाच्या वर्षी 54 दिवसांचा शिक्षकांचा संप ही एक सहसा न घडणारी घटना आपण अनुभवली.पण नंतर त्याच शिक्षकांनी अतिशय तळमळीने आपल्याला शिकवले आणि सेमी इंग्लिश माध्यमाची पहिली बॅच,जी आपली शाळा सोडून फक्त पार्ले टिळक विद्यालयात सुरू झाली होती ती अतिशय यशस्वी करून दाखवली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Is Test Cricket Changing? Yes

यमन

मला न समजलेली अमेरिका