७० च्या दशकातलं सांस्कृतिक ठाणं
७० च्या दशकातलं सांस्कृतिक ठाणं
ठाणं शहर हे कायमच सांस्कृतिक होतं आणि आहे. आता गर्दी प्रचंड झाली आहे, चालता येत नाही, वाहनांनी आपण चिरडून जाऊ का, गोखले रोड क्रॉस करायची आजची स्ट्रॅटेजी काय ठेवावी, आज आपण गोखले रोड क्रॉस केलाच नाही तर चालेल का इत्यादी प्रश्न रोजचेच असले तरीही ठाण्याची सांस्कृतिक नाळ कधीच तुटली नाही.
आम्ही शाळेत होतो तेव्हासुद्धा ठाणं सांस्कृतिक रीत्या बहरात होतंच.
अगदी पहिला उल्लेख अर्थातच घंटाळी मित्र मंडळ. ते अजून चालू आहे की नाही ते माहित नाही, परंतु चालू असावं असं वाटतंय. घंटाळी मित्र मंडळाचे अतिशय दर्जेदार कार्यक्रम घड्याळ लावून रात्री ९.३० वाजता चालू व्हायचे. ९.२५ वाजले की, "बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" हे चालू. आणि ९.३० वाजता मुख्य कार्यक्रम. वर्गणी मागायला, आणि नंतर हिशोब/प्रसाद द्यायला जे कार्यकर्ते यायचे ते वर्षानुवर्षे तेच होते, म्हणून ते आमच्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरातलेच झाले होते. आणि मुख्य म्हणजे सगळी घरं ही lower middle क्लास मधली होती तरी वर्गणी द्यायला कोणीच खळखळ करीत नसे (आणि कित्येक lower middle क्लास चे लोकं जास्तीच वर्गणी द्यायचे). मंडळावर आणि कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास होता. मंडळ अस्तित्वात असेल तर आजही विश्वास असेल.
मंतरलेल्या चैत्रबनात मी पहिल्यांदा तिथे पाहिलं. मला वाटतं एकदा शरद पवार आणि इतर काही नेते येणार होते, व्याख्यान द्यायला. बाकी येऊ शकले नाहीत. पण शरद पवारांनी २ १/२ तास सुंदर भाषण दिलं. कुठेही नोट्स न बघता! अजूनही घंटाळीच जुनं मंदिर, जुनं पटांगण, त्यात एका बाजूला केलेलं स्टेज (आत्ताच कायम बांधलेलं स्टेज तेव्हा नव्हतं), आनंदी साऊंड सर्व्हिस, जेवण आटपून आलेले सगळे लोक, महाराष्ट्र गीत आणि मग कार्यक्रम हे तपशीलवार आठवतं.
आता जिथे घड्याळाचा टॉवर आहे, तळ्यावर, तिथे वर्षातून एकदा सगळ्या शाळांच्या स्पर्धा व्हायच्या. मी आणि श्रीकांत राजे (अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय डॉक्टर), आम्ही तिसरीत (का चौथीत कोण जाणे) तिथे बक्षीस मिळवलेलं आठवतंय. आताचे सुप्रसिद्ध डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी केलेला एक सुंदर कार्यक्रम पण आठवतोय. अर्थात ते शाळेत असतांना. भारत, पाकिस्तान मधल्या युध्दावर आधारित कार्यक्रम होता तो.
रंगायतन व्हायचं होतं. पण सुदैवाने आमच्या शाळेचं ग्राउंड आणि स्टेज हे नाटकाला अनुकूल होतं. बंदिस्त नसलं तरी बंदिस्त असल्याचा भास व्हायचा. एका बाजूला शाळेची इमारत असल्यामुळे तसं वाटत असेल. तिथे मी कट्यार काळजात घुसली, तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले वगैरे अनेक नाटकं बघितली. शिवाय आमच्या शाळेत गॅदरिंग मध्ये उत्तम नाटकं व्हायची. एकदा आमच्या सिनिअर्स नी अश्रूंची झाली फुले केलं होतं. मला वाटतं नरेंद्र बेडेकर, वैद्य (पहिलं नाव विसरलो), आपटे (याचंही विसरलो) हे होते. स्टेजवर सिगारेट ओढण्याची स्पेशल परवानगी आमच्या शिक्षकांनी दिली होती. आता याचं काही वाटणार नाही, पण तेव्हा शाळेत असताना सिगारेट ओढणं ही नवलाई होती. मिरासदारांची "धडपडणारी मुले" निदान मो ह विद्यालयात तरी फारशी नव्हती.
हनुमान व्यायामशाळेतसुद्धा गणपती उत्सवात एक तरी उत्तम, तीन अंकी नाटक व्हायचं. त्याकरता माजी विद्यार्थी आवर्जून यायचे, प्रसंगी नाटक बसवायचे. रजन ताम्हाणे, मधू ताम्हाणे, राम टोपले ही मला सहज आठवलेली नावं.
संगीत प्रेमी मंडळ, कळवा हे जोरात होतं. मोठे मोठे गवई आलेले आहेत. मला वाटतं स्मिता घैसास, जी आमच्या शाळेत/वर्गात होती, तिचे वडील यामध्ये ऍक्टिव्ह होते.
कधी कधी ऑर्केस्ट्रे यायचे. बाबला, महेशकुमार, मेलडी मेकर्स, प्रमिला दातार.
रंगायतन झाल्यावर हे सगळं शाळेतून रंगायतन मध्ये गेलं.
आमच्या काळे गुरुजींच्या क्लास चा गुरुपौर्णिमा उत्सव ही तर पर्वणीच. एकदा गुरुजींचं गाणं, मग एका शनिवारी रात्री दोन/तीन वाजेपर्यंत ज्युनिअर लोकांचा कार्यक्रम, पुढच्या शनिवारी रात्रभर सिनियर विद्यार्थी.
अजूनही कधी कधी वाटतं. की पुन्हा शाळेत जावं (जुन्या बिल्डिंगमध्ये), तिथे बाहेर नाटकाचे फलक असावेत, आपण घरी येऊन सांगावं, संध्याकाळी जाऊन तिकिटं काढून आणावीत, सगळ्यांनी नाटकाला जावं, मध्यंतरात शाळेतल्या त्या छोट्याच्या टपरीत मिळणारा चहा प्यावा, वडा खावा, रात्री उशिरा थंडी वाजत असताना (आता ती पण गायब असते) घरी यावं. किंवा नवरात्रात पटकन जेऊन घंटाळीच्या मैदानावर जावं. किंवा गुरुपौर्णिमेच्या प्रोग्रॅमची प्रॅक्टिस करावी, रात्री फारसं न जेवता सेवा संघात जावं, तिथे बरोबर साडे नऊ वाजता कार्यक्रम सुरु व्हावा. मग मध्यरात्रि कधीतरी स्टेशनवर जाऊन काहीतरी खाऊन यावं (आम्लेट पाव, भाजी पाव!), आणि भल्या सकाळी घरी परतावं.
असो. आता गुरुजी गेले, रात्रीचे कार्यक्रम कमी झाले, घंटाळी चालू आहे की नाही कोण जाणे, रंगायतन मात्र आहे आणि तिथे नाटकं पण आहेत. कधीतरी हा कार्यक्रम रंगायतनमध्ये करायला हरकत नाही. वडा चांगला मिळाला की झालं!
Comments
Post a Comment