सरस्वती: आहे मनोहर तरी!

सरस्वती: आहे  मनोहर तरी! 

विदर्भ साहित्य मंडळाने दिलेला पुरस्कार प्रसिद्ध कवी श्री यशवंत मनोहर यांनी नाकारला! बर नाकारला तर नाकारला, मला नको बुवा तुमचा पुरस्कार असं पहिल्यांदाच सांगितलं असतं तर शांतपणे तो दुसऱ्या कोणालातरी देता आला असता (माझं नावही त्या यादीत होतं, जरा खाली होतं, पण होतं... जाऊदे). पण तसं काही न होता तो जाहीररीत्या नाकारला. आणि मग त्यावर मोठीच खळबळ उडाली (किंवा खळबळ उडून राहिली आहे). माझ्या मते तो पुरस्कार मला देता आला नाही ही यातली सगळ्यात खळबळजनक गोष्ट, पण असो. 

आणि यामध्ये त्यांनी खुद्द सरस्वतीला ओढलं. म्हणजे गुप्त झालेली नदी नव्हे, खरीच. शाळेत असताना पाटीवर काढतो तीच. 

मग मी जाऊन त्यांची मुलाखत बघितली. तर गम्मत म्हणजे त्या मुलाखतीत मुख्य मुद्द्याला हातच घातला नाहीये. स्वतःची प्रतिमा काय आहे यावर बरीच चर्चा आहे (प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणतात ती हीच का?). शिवाय स्वतःची तब्येत, खाणं/पिणं. आणि पिणं नाहीच, कारण मला काहीही व्यसन नाही असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे (पुरस्कार परत करणे हे व्यसन असू शकतं का, एक शंका). 

न पिणारा एकमेव साहित्यिक म्हणून त्यांना पुरस्कार द्यावा असं माझं मत आहे. पण नकोच, तोही नाकारला तर काय घ्या? 

यावरून माझ्या काही सूचना आहेत, त्यांचा विचार व्हावा. 

प्रत्येक साहित्य मंडळाने आपण कुणाकुणाच्या मूर्त्या कुठे कुठे ठेवल्या आहेत याची यादी जाहीर करावी. प्रत्येक साहित्यिकांनी मला कुठल्या कुठल्या मूर्त्या चालतील याची यादी जाहीर करावी. मग बंगलोर किंवा पुणे किंवा हैद्राबाद, अशा ज्या Information टेकनॉलॉजि  मधल्या जागा आहेत तिथून पाच/दहा सॉफ्टवेअर चे लोकं पकडून आणावेत. त्यांच्याकडून एक प्रोग्राम लिहून घेऊन दोन्ही याद्यात बसतील असे प्रोस्पेक्टिव्ह साहित्यिक शोधावेत. आणि मग चिठ्ठ्या टाकून एकाला पुरस्कार द्यावा. म्हणजे उगीच नाकारण्याची भानगड नको. 

तूर्तास मी सरस्वती राग वाजवावा की नाही या चिंतेत पडलो आहे. 


 

Comments

Popular posts from this blog

Is Test Cricket Changing? Yes

यमन

मला न समजलेली अमेरिका