चारचौघे

 चारचौघे

सर्व प्रथम म्हणजे अनिल दादाचं अभिनंदन. पंच्याहत्तरी बद्दल. शिवाय अर्चना वहिनीचं पण. त्याच्या ७५  वर्षात तिचा पन्नास तरी वर्षांचा वाटा आहे. अनिल दादाला सांभाळणं ही कर्मकठीण गोष्ट तिने करून दाखवली आहे! 

मी लिहायला बसलो तेव्हा लक्षात आलं की आम्ही चार भाऊ. मी, अनिल दादा, अरविंद दादा, आणि सुनील दादा. अर्थात अरविंद दादा आता आपल्यात नाही. पण त्याची आठवण अपरिहार्य आहेच.

त्यांना अप्पा (अरविंद दादा) आणि अण्णा (अनिल दादा) अशी पण नावं होती. माझ्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी मधल्या पिढीचा. त्यामुळे लहान असताना या तिन्ही भावांकडून भरपूर लाड झाले. मला आठवतंय, मला पहिली मस्तानी अनिल दादांनी खाऊ घातली. तीसुद्धा एकदम ऑथेंटिक. सदाशिव पेठ, निंबाळकर तालमीच्या जवळ. त्याचबरोबर माझा पहिला ७०  mm सिनेमा, शोले, तो पण अनिल दादाबरोबर पाहिला. मी जेमतेम शाळकरी, त्यामुळे मी पैसे खर्च करायचा प्रश्नच नव्हता. अनिल दादा नेहेमीप्रमाणे मला स्कुटर वर बसवून नटराज टॉकीज मध्ये घेऊन गेला. आणि इथेच थांब म्हणाला. मी तो पर्यंत बाल्कनीत कधीच बसलो नव्हतो. अर्थात हल्ली मॉल च्या जगात बाल्कनी, ड्रेस स्टॉल, बॉक्स इत्यादी शब्द इतिहासजमा झाले आहेत. मी आपला इथे तिथे बघून बावळटासारखा ड्रेस स्टॉल च्या लायनीत जाऊन उभा राहिलो. तर पाच मिनिटात अनिल दादा हजर. आणि बाल्कनीची तिकिटं! आता कोणाला खरं वाटणार नाही, पण स्टॉल ३.३० आणि बाल्कनी ४.४०  अशा किमती असायच्या. 

आम्ही चौघे भाऊ, पण आमच्या दोन तऱ्हा. मी आणि सुनील दादा साधारण एका विचारांचे, आणि अरविंद दादा अनिल दादा वेगळे. अर्थात लहानपणी हा फरक समजायचं वय नव्हतं. 

अनिलदादा आणि अरविंददादा एकदा स्कुटर वरून पुण्याहून ठाण्याला आले होते. आमच्याकडे होते. आई म्हणाली की स्वयंपाकघराचा कट्टा बदलायचा आहे. तर अनिलदादा म्हणाला, हलवून बघू. तर काय. दोघेही दणकट. जरा कट्टा हलवला तर तो पडायलाच आला. आई घाबरून म्हणाली, नको रे बाबा. काही करू नका. तशी आई दोघांनाही घाबरून असायची. कारण निघताना नमस्कार करायची वेळ आली के हे दोघे आईच्या पायाला चिमटे काढायचे!

अनिलदादा, अरविंददादा आणि शैलाताई सुद्धा, हे सगळे सकाळी ओव्हलटिन आणि पोळ्या खाऊन जायचे. काकू एकदा मांडी ठोकून बसली, की अगणित पोळ्या करायची. अनिलदादा गॅरेजमधून तीन साडेतीन ला जेवायला परत यायचा. मुंबईच्या माणसाला याचं वेगळेपण कळेल. मुंबईत इतक्या उशिरा कोणी जेवत नाही. 

अनिलदादवरच्या वरचा लेख आणि त्याच्या झुबकेदार मिशांचा उल्लेख केला नाही तर दखलपात्र गुन्हा होईल. आम्हाला लहानपणी सांगायचा की श्रीखंड केलं की तो मिशीमध्ये अडकलेलं बराच वेळ खात बसायचा. आणि आम्हाला ते खरं वाटायचं! पण लग्नानंतर या मिशांना चाट मिळाली (अर्चना वहिनी दुष्ट आहे,  दुष्ट आहे,  दुष्ट आहे). असो, बरी आहे ती तशी (म्हणजे चहा तरी मिळेल!). 

त्याच्या गॅरेजचं नाव पण एकदम वेगळं. किंवा, आजच्या तरुणाईच्या भाषेत, "हटके". स्कु मो क्लिनिक. आणि या क्लिनिक मध्ये डॉक्टर अनिल दातार त्यांच्या पेशंट्सना ठाक ठीक करून द्यायचे. बरे पेशंट असतील तर त्यांना टेस्ट मिळायची (म्हणजे अनिलदादा ती स्कुटर घेऊन घरी जेवायला यायचा). नाठाळ पेशंटना काय करायचा हे माहिती नाही. मला वाटतं नाठाळ पेशंट्स ना तो एक हिंदुत्वाचं लेक्चर देत असेल. पुण्याच्या ऐन थंडीत अनिलदादाचे ज्वलंत विचार व्यक्त झाले की घरातले सगळे जण स्वेटर घालतात असं ऐकिवात आहे. खरं खोटं वहिनीला माहित. 

चौघे भाऊ. एक साम्य म्हणजे गाण्याची आवड. ती पूर्ण दातार घराण्यात आहे. अरविंददादा उत्तम गायचा. सुनील दादा आणि अनिल दादा कानसेन आहेत. पुढच्या पिढितसुद्धा गाण्याचा गुण पूर्ण आलेला आहे. राजकीय दृष्टी म्हणली तर बाबा विवेकानंद केंद्राचे. अरविंद दादा (बहुधा) आणि अनिलदादा (नक्की) संघाचे. मी आणि सुनीलदादा तसे कुठलेच नाही. 

पण एक गोष्ट नक्की. आमच्या चौघाही भावांच्यात अनिल दादा दिसायला एकदमच रुबाबदार. त्याच्या त्या मिशा, कमावलेली तब्येत, व्यक्तिमत्व हे सगळ्यांच्या पेक्षा वेगळं आहे. 

अनिलदादा आणि वहिनी : दोघांना शुभेच्छा मी आणि अश्विनीकडून. आता काळजी करायचे दिवस संपले, फक्त मजा! मागच्या वेळेला अनिलदादा / वहिनी ताईकडे आले होते तेव्हा एका सकाळच्या मजेत मी पण सामील होतो. पण सर्व गोष्टी उघड करण्यात अर्थ नाही. 

(अ)विवेक 





Comments

Popular posts from this blog

Is Test Cricket Changing? Yes

यमन

मला न समजलेली अमेरिका