पंडितराव बाई

 पंडितराव बाई 

हे शीर्षक बघितल्यावर काहीतरी चुकतंय का असं वाटू शकेल! पण नाही. नी गो पंडितराव सर सगळ्यांना माहिती आहेत. ठाण्यामधले जे जुने किंवा नवीनसुद्धा लोक, मुलं आहेत त्यांना नी गो पंडितराव वक्तृत्व स्पर्धा माहिती असतीलच. ही स्पर्धा महाराष्ट्रात सुद्धा माहिती आहे. पंडितराव बाई म्हणजे नी गो पंडितराव यांच्या पत्नी. स्वतः पंडितराव सर म्हणजे अस्सल शिक्षक, शिवाय तापटही. मी स्वतः त्यांना पाहिलं नाही. ते अतिशय लोकप्रिय होते, कडक होते, आदरणीय होते (आणि आहेत) आणि ते शिकवतानाच गेले. एव्हढंच माहिती. 

मला पंडितराव बाई माझ्या तिसरीत भेटल्या, आणि नंतर मी आणि माझे वर्गमित्र यांच्या आयुष्याच्या भाग बनून गेल्या. माझे वर्गमित्र म्हणजे मनोज वाकडे, श्रीकांत राजे, दिलीप लोंढे, संतोष ताम्हणे इत्यादी. 

आमची शाळा, बेडेकर विद्या मंदिर. बाई तिथे मागेच मांडवीकर वाडीत राहायच्या. आता तिथे "रावण गर्वहर द्विभुज" गणपती मंदिर आहे. बाई अतिशय प्रेमळ, विद्यार्थ्यांविषयी कळकळ, शांत, हसतमुख. त्या रागावलेल्या मला काही आठवत नाहीत. 

आमची तिसरी सुटली, चौथी सुटली, मग आम्ही सर्व जण मो ह विद्यालयात गेलो, आमची १०वी/१२वी झाली, इतस्ततः विखुरलो. पण पंडितराव बाई आमच्या आयुष्यात जशाच्या तशा राहिल्या. वर्षानुवर्ष आम्ही दसऱ्याच्या दिवशी सोनं द्यायला जायचोच. पुढे मी परदेशात गेलो, स्थिरावलो. पण एकदा दसऱ्याच्या वेळेला भारतात होतो तर आपोआप पाय मांडवीकर वाडीकडे गेलेच! 

पुढे बाई गेल्या. आणि आमचा एक सांस्कृतिक सांधा निसटून गेला. 

Comments

Popular posts from this blog

Is Test Cricket Changing? Yes

यमन

मला न समजलेली अमेरिका