इंटरनेट कसं चालतं
या पिढीला सांगूनही कळणार नाही की कोणे एके काळी इंटरनेट अस्तितवात नव्हतं. आता नेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि नेट.
"अरे यार नेमका नेटपॅक संपला", "सालं नेट स्लो आहे" इत्यादी उद्गार आपल्या आता परिचयाचे झाले आहेत.
आपल्या पिढीला नेट नसण्याची सवय (पूर्वी तरी) होती. तर हे इंटरनेट म्हणजे काय आहे, आणि ते कसं चालतं याची सहज सोपी ओळख करून द्यावी या उद्देशाने हा लेख लिहिलेला आहे. या लेखात मी सर्वसाधारणपणे टेक्निकल टर्म्स वापरणार नाहीये. फार टेक्निकल टर्म्स वापरल्या तर उगीचच गोष्टी कठीण वाटतात. माझं एक तत्व आहे की नेटवर्किंग मधल्या सगळ्या गोष्टी ट्रॅफिक च्या संदर्भात सांगता येतात. आणि ट्रॅफिक म्हणजे आपला रस्त्यावरचा! नेटवरचं ट्रॅफिक कंजेशन आणि राम मारुती रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम यात फारसा फरक नाही.
तर मुळात अशी गोष्ट आहे की पूर्वी सगळे कॉम्प्युटर्स हे एकमेकांशी जोडलेले नव्हते. युनिव्हर्सिटी ऑफ हवाई मध्ये एक प्रोजेक्ट होता, त्यात या कॉम्पुटरना जोडलं गेलं. आता एकदा हे कॉम्प्युटर्स जोडले गेले की त्यांची पॉवर एकदम वाढते. म्हणजे असं, की एक माणूस काहीतरी काम करू शकतो. दोघे आले की दुप्पट होतं. पण जसजसे जास्त लोक एकत्र येतात तसतसा कामाचा आवाका वाढतो. अर्थात हे कॉम्प्युटर्स मराठी नव्हते! दोन मराठी माणसं एकत्र आली की एक महाराष्ट्र मंडळ स्थापन होतं, आणि तीन एकत्र आली की दोन मंडळं. पण कॉम्प्युटर्स मात्र एकमेकांशी न भांडता कामाचं वाटप करतात.
म्हणूनच ज्याप्रमाणे प्रत्येक राजवट रस्ते बांधते त्याप्रमाणे सर्व राजवटींनी इन्फॉर्मशन हायवे बांधायला सुरवात केली. म्हणजे देशभर नेटववर्किंगचं जाळं उभारलं गेलं. हे नेटवर्क म्हणजे इंटरनेट. अर्थात ते फक्त एका देशापुरतं मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय नेटवर्क झालं.
यामध्ये ढोबळ मानाने पब्लिक नेटवर्क आणि प्रायव्हेट नेटवर्क असं वर्गीकरण होतं. यापैकी प्रायव्हेट नेटवर्क हा विषय आपण या लेखात आणणार नाहीयोत. प्रायव्हेट कंपन्या स्वतःच प्रायव्हेट नेटवर्क करतात. म्हणजे उद्या जर टाटा कंपनीने ठरवलं की आपल्या मालवाहतुकीसाठी भारतभर आपण स्वतःच्या मालकीचे रस्ते बांधू तर ते झालं प्रायव्हेट नेटवर्क. आणि भारत सरकारने रस्ते बांधले तर ते पब्लिक नेटवर्क.
तर ज्याप्रमाणे आपण कुठल्याही शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतो त्याप्रमाणे हे इंटरनेटचं जाळं विणलं गेलं. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे सरकार रस्ते बांधण्याचं काम करतं त्याचप्रमाणे नेटवर्किंगच्या लिंक्स टाकल्या गेल्या. यामध्ये फायबर ऑप्टीकस च्या लिंक असल्या तर त्यांना मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणायला हरकत नाही. आणि बाकीच्या लिंक्स म्हणजे मुंबई पुणे जुना रस्ता. त्याचप्रमाणे शहरांच्यात ज्याप्रमाणे छोटे मोठे रस्ते असतात त्याचप्रमाणे लिंक्सचं जाळं शहरांच्यात निर्माण झालं. ठाण्यात तर ही गोष्ट वेगळी सांगायलाच नको. कारण सर्व नियम धाब्यावर बसवून एका बिल्डिंगच्या गच्चीवरून खुशाल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये केबल्स नेलेल्या असतात.
आता अजून एका प्रश्नाला हात घालून लेख संपवतो. तो प्रश्न असा आहे, की इंटरनेटवर राऊंटिंग कसं होतं. म्हणजे पॅकेट्स इथून तिथे कशी जातात. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. पण त्याचं उत्तर नीट न मिळाल्यामुळे ते "हे ब्लॅक मॅजिक आहे" असं म्हणून स्वस्थ बसतात. तर हे ब्लॅक मॅजिक वगैरे नाहीये. आपण साध्या ठाणे-पुणे रस्त्याचं उदाहरण घेऊ.
समजा की माझा PVC पाईप्स चा व्यवसाय आहे. आणि माझ्या पुण्याच्या डिस्ट्रिब्युटरने मला सांगितलंय की एक टेम्पो भरून पाईप्स पाठव. ठीक आहे. मग मी टेम्पो भरला आणि ड्रायव्हरला पत्ता दिला, कोथरूड, पुणे. आमच्या ड्रायव्हरनी इथे तिथे चौकशी करून हे शोधून काढलं की एक्सप्रेसवेवर जॅम आहे. म्हणून तो जुन्या मुंबई पुणे रस्त्याने गेला.
ठीक आहे? हे तर अगदीच सोपं उदाहरण आहे. आता हे नेटवर्किंगमध्ये कसं सोडवलं जातं ते पाहू. प्रत्येक शहरात रस्त्यांची माहिती असणारे दोन वाटाडे आहेत असं गृहीत धरा. पहिला वाटाड्या आहे तो स्थानिक आहे. त्याला सगळ्या स्थानिक रस्त्यांची माहिती आहे. दुसरा वाटाड्या हा राज्य स्तरावरचा आहे. त्याला शहरांना जोडणारे रस्ते माहिती आहेत. आपण त्यांना स्थानिक आणि राज्यस्तरीय अशी नावं देऊ.
आता हा माझा टेम्पोवाला आहे तो पहिल्यांदा स्थानिकाकडे जाईल, आणि पत्ता दाखवेल. स्थानिक म्हणेल हा पत्ता ठाण्याचा नाही. माझा सहकारी इथे आहे, त्याचं नाव आहे "ठाण्याचा राज्यस्तरीय" तो तुला सल्ला देईल, मला जे समजत नाही ते सर्व मी त्याच्याकडे पाठवतो.
टेम्पोवाला आता जाईल "ठाण्याचा राज्यस्तरीय" माणसाकडे. ठाण्याचा राज्यस्तरीय म्हणेल, "अच्छा, तुला पुण्याला जायचंय, माझा "पुण्याचा राज्यस्तरीय" सहकारी आहे त्याचं माझं दर दहा मिनिटांनी बोलणं होतं. तो आत्ताच म्हणाला की एक्सप्रेसवे जॅम आहे. तू जुन्या मुंबई पुणे रस्त्यानी जा, आणि त्याला भेट".
आता टेम्पोवाला पुण्याला जाईल आणि "पुण्याचा राज्यस्तरीय" या माणसाला भेटेल. तो म्हणेल, "तुझा पत्ता पुण्याचा आहे. आता तू असं कर, माझा स्थानिक सहकारी इथे आहे, त्याला भेट. तो तुला आतल्या रस्त्यांची माहिती देईल".
आता टेम्पोवाला "पुण्याचा स्थानिक" याला भेटून मग सुखरूप कोथरूडला जाईल.
तर या सोप्या उदाहरणात काही महत्वाच्या गोष्टी आहेत. इंटरनेट मध्ये राऊंटिंग प्रोटोकॉल आणि राऊटेड प्रोटोकॉल (किंवा अप्लिकेशन प्रोटोकॉल) असं वर्गीकरण केलं जातं. या उदाहरणात पुण्याच्या डिस्ट्रिब्युटरचा फोन हा राऊटेड प्रोटोकॉल (किंवा अप्लिकेशन प्रोटोकॉल) आहे. त्यांना पाईप्स कसे येतील याच्याशी काहीही संबंध नाही; पाईप्स आल्याशी कारण. आणि सगळे वाटाडे हे राऊंटिंग प्रोटोकॉल चे सभासद आहेत. त्यांना तुम्ही पाईप्स पाठवताय की दगडं पाठवताय यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. तुम्ही काय वाट्टेल ते पाठवा, ते सुखरूप डिलिव्हर करण्याची जबाबदारी ते घेतात.
थोड्या टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर वाटाडे एकमेकांशी BGP हा प्रोटोकॉल वापरून संभाषण करतात, आणि त्यांना एकमेकांशी सतत बोलणं आवश्यक असतं. कारण कुठला रस्ता कधी बंद होईल ते कोणीच सांगू शकत नाही. अर्थात ही गोष्ट सोपी नाही. जगभर जे इंटरनेट आहे त्याचे राऊटर्स एकमेकांशी BGP प्रोटोकॉल वापरून सतत संभाषण करत असतात. याच राऊटर्सचा उपयोग करून एखादं राष्ट्र एखादी साईट बॅन करू शकतं. एक खरं उदाहरण घेतो. पाकिस्तानला त्यांच्या देशातून youtube बॅन करायचं होतं. हे करण्याकरता त्यांचे जे BGP राऊटर्स होते, त्यांना हे सांगायची गरज होती की youtube.com चा ट्रॅफिक येईल त्याला पत्ता सांगू नका. म्हणजे आपला "ठाण्याचा राज्यस्तरीय" आहे त्यांनी पुण्याचा रस्ताच सांगितला नाही तर माझा टेम्पो कधीच पोचणार नाही!
परंतु त्यांनी थोडी चूक केली, आणि ग्लोबल इंटरनेटवर असं जाहीर केलं की youtube.com चा ट्रॅफिक आमच्याकडे पाठवा. आणि त्यांनी तो ट्रॅफिक ड्रॉप करायला सुरुवात केली. त्यांना असं वाटत होतं की आपण पाकिस्तानचा youtube.com ट्रॅफिक ड्रॉप करतोय. प्रत्यक्षात ते जगभरचा youtube.com ट्रॅफिक ड्रॉप करत होते! जिज्ञासूना इथे आणखी माहिती मिळेल (https://www.cnet.com/news/how-pakistan-knocked-youtube-offline-and-how-to-make-sure-it-never-happens-again/).
असो. हा लेख फार टेक्निकल झाला नसेल अशी आशा करतो.
Comments
Post a Comment