मी, ऑर्गन आणि राजीव परांजपे
मी, ऑर्गन आणि राजीव परांजपे
कलादशक च्या वेळेला मंजुषाचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम, साथीला राजीव परांजपे आणि मयंक बेडेकर (इंदूरचा young तबलजी) असे होते. त्यावेळेला साथीला ऑर्गन का घेऊ नये असा विचार मी आणि आनंद (आनंद कर्वे) दोघांनी केला. राजूशी बोललो तर तो म्हणाला की तुला सॅन फ्रँसिस्को मध्ये ऑर्गन भाड्यानी मिळेल. एक दिवस आधी मी आणि आनंद जाऊन घेऊन आलॊ. ती जागा म्हणजे एक नॉन डिस्क्रिप्टिव्ह भाग! पूर्वी जिथे सॅन फ्रांसिस्को फोर्टी नायनर्स खेळायचे, किंवा जायंट्स खेळायचे त्या स्टेडिअमजवळ बऱ्यापैकी बकाल वस्तीत ते गराज सदृश्य स्थळ होतं. ऑर्गन कसा उघडायचा हे पण माहिती नव्हतं. राजू म्हणाला की तुला पेटी खोक्यातून काढून स्टेजवर ठेवायला जितका वेळ लागतो तितकाच ऑर्गन उघडायला लागतो.
प्रोगॅम ५ वाजता. त्याच दिवशी सकाळी मी राजू, मंजुषा आणि मयंकला सॅन होसे एअरपोर्ट वरून ११ वाजता घरी घेऊन आलो. राजीव परांजपे हे ऑर्गन आणि हार्मोनियम क्षेत्रातलं मोठं नाव. वाजवणे याच बरोबर ऑर्गन आणि पेट्या बांधणे याची पुरेपूर माहिती. आता आपल्याला कोकणातले बाळ दाते हे ऑर्गन बनवणारे म्हणून माहिती आहेत. पण राजू गेले ३५ वर्ष यात वेगवेगळे प्रयोग करीत आलेला आहे. आल्या आल्या राजुने ऑर्गन उघडला. पूर्ण उघडला. त्यातल्या सगळ्या रीड्स बाहेर काढून अड्जस्ट केल्या. वाजवला तर लक्षात आलं की तो पूर्णपणे detune झालेला आहे. ऑर्गन पूर्ण tune करूनच राजू आणि आम्ही जेवण केलं.
लगेच निघालो, आणि प्रोग्रॅम झाला. उत्तम झाला. आता सांगायला हरकत नाही की प्रोग्रॅमचा निवेदक फार म्हणजे फारच उत्तम होता. अर्थातच मी. पण आता काय आहे की चिन्मय, अभय यांच्या पोटावर पाय कशाला द्या! त्यातून त्या दोघांपैकी एकाच्या पोटावर पाय देणं अगदीच सोपं. कारण... जाऊदे. तेही माझे मित्रच आहेत.
रात्री पार्टी, काही पेयं वगैरे झाल्यावर उशिरा घरी आलो. राजीवने तो ऑर्गन झोपायच्या आधी जसाच्या तसा करून ठेवला.
Comments
Post a Comment