विलास जोशी सर
विलास जोशी सर
आमचे विलास जोशी सर म्हणजे एकदम रुबाबदार. सरांची प्रत्येक गोष्ट म्हणजे टापटीप या शब्दाची व्याख्याच. सरळच सांगायचं तर सर एकदम हिरो होते. शिकवणं पण अतिशय व्यवस्थित आणि टापटिपीचं. मला अजून त्यांची कडक इस्त्री केलेली पॅन्ट (ती गॅबर्डीनची होती का?) आठवते. ते शाळेत तर होतेच, शिवाय उदय पाध्येंच्या घरी क्लास होता तिथे पण शिकवायचे, आणि नंतर आमच्या काही जणांकरता त्यांनी घरी लायब्ररी चालू केली होती तेव्हा तर घरीच भेटायचे.
पण ही नंतरची गोष्ट झाली.
सुरुवातीला मला वाटतं सर कळव्याला राहायचे. तिथून सायकलनी शाळेत यायचे. तेव्हासुद्धा आजूबाजूला चिटपाखरू सुद्धा नसलं तरी सर वळताना हात दाखवणार म्हणजे दाखवणारच. हो आणि त्यावेळेला ठाण्यात चिटपाखरू सुद्धा नसेल अशा वेळा असायच्या. हल्ली मला वाटतं पहाटे ४.०० ते ४.०१ पर्यंत थोडीशी शांतता असते असा प्रवाद आहे.
नंतर सरांनी उदय पाध्येंच्या (म्हणजे पाध्ये बाईंच्या) घरासमोर नवीन फ्लॅट घेतला. मग त्यांची सायकल बंद झाली. या नव्या घरात असताना त्यांचं लग्न झालं. मग मुलाला कडेवर घेऊन पुष्कळदा दिसायचे. या नवीन घरातच त्यांची लायब्ररी होती. मला वाटतं माझी वर्णी तिथे केवळ मी अकरावी/बारावी मध्ये शाळेतच राहिलो म्हणून लागली होती.
नंतर कधीतरी भिडे सर म्हणाले की त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. मला वाटतं ते वावीकरनेच केलं असावं. आणि आता ते ठाण्यात राहत नाहीत असंही समजलं. आता त्यांनी हा लेख वाचला तर मला खूपच बरं वाटेल.
विलास जोशी, तामरस, खोल्लम सर, भिडे सर, सामंत सर, पटवर्धन बाई (मी पहिली संधी मिळाल्या मिळाल्या बायोलॉजी सोडलं याचा पटवर्धन बाईंशी काही संबंध नाही!), आणि इतर अनेक.....
आयुष्यात काही ऋणं फेडायची नसतात
- (अ)विवेक
Comments
Post a Comment